*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील सेवानिवृत्त कॅप्टन आमसिध्द भिसे (निवृत्त) यांचा जनरल अफसर कमांडीग इन चीफ दक्षिण कमानच्या वतीने मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
कॅप्टन आमसिध्द भिसे हे १९६३ मध्ये पंढरपूर येथे फौजमध्ये भरती झाले होते. त्यांनी आपल्या २८ वर्षाच्या सेवेत १९६५ व १९७१ मध्ये पाकिस्तानच्या युध्दात भाग घेतला होता.नागालँड,मिझोराम, आसाम,हिमाचल प्रदेश,जम्मू काश्मीर इत्यादी सीमावर्ती राज्यात त्यांनी देश सेवा केली होती.जानेवारी १९९१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते.
सन १९९३ - ९४ मध्ये अखिल महाराष्ट्र राज्य माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष ए.आर.वैद्य व बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील ते संघटनेत सहभागी होवून दिघी शाखेचे अध्यक्ष झाले.डिसेंबर १९९४ मध्ये स्वर्गीय शामराव भिसे यांच्या मार्गदर्शनाखालील माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.गेली ३० वर्षे ते या पतसंस्थेचे चेअरमन म्हणुन कार्यरत आहेत. कॅप्टन भिसे यांनी माजी सैनिक विकास संघाची स्थापना करुन माजी सैनिकांना योग्य ते मार्गदर्शन केले.सामाजिक कार्यात मदत केली.माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अभ्यास करणेसाठी वाचनालय उपलब्ध करून दिली,विवाह योग्य मुलां मुलींना स्थळ शोधणे,तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सामोपचाराने तंटे सोडविणे, स्वच्छता मोहिम राबविणे आदी कामे त्यांनी केली.या सामाजिक व सहकार क्षेत्रातील कामाची दखल घेत दक्षिण कमानचे जनरल अफसर कमांडिंग इन चिफ लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ व बॉम्बे इंजिनिअर ग्रुप चे कमांडंट ब्रिगेडियर परमजितसिंग यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा