*© *ॲड. शीतल शामराव चव्हाण*
*उमरगा--मो:- 9921657346
एकेकाळी भाजप आणि विशेषत: भाजपचे महाराष्ट्रातील मसिहा देवेंद्रपंत फडणवीस यांच्याद्वारे ज्या अजितदादा पवारांवर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप ठेवून अजितदादांना जेलमध्ये 'चक्की पिसिंग, पिसिंग, पिसिंग' करायला लावण्याची भीष्मप्रतिज्ञा झाली होती, त्याच अजितदादा पवारांवर भाजपच्या पवित्र गोमूत्राचे 'सिंचन' झाल्याने आज सबंध महाराष्ट्राला अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प पाहण्याचा पुन: योग आला. लोकशाहीचे सगळे विधीनिषेध बाजूला ठेवून एकदाचे देवेंद्रपंतांना व अजितदादांना अनुक्रमे अनभिषिक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री करुनच टाकावे, म्हणजे महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा 'पुन्हा येईन किंवा पुन्हा आलो'च्या किंचाळ्या आणि जलसिंचन घोटाळ्याच्या आरोप-क्लिनचिटचा लपंडाव ऐकत व पाहत बसण्याची नामुष्की येणार नाही.
तर अजितदादांनी अखेर अर्थसंकल्प मांडला! या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचे विशेष लक्ष होते. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आश्वासनांची पूर्ती या अर्थसंकल्पाद्वारे महायुती करणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष असल्याने या अर्थसंकल्पातून महायुतीचे चरित्र जनतेसमोर येणार होते. आज अखेर ते सबंध महाराष्ट्रासमोर उघडे झालेच. मागे उद्धव ठाकरे भाजपच्या हिंदूत्वाला शेंडी-जान्हव्याचे हिंदूत्व म्हणाले होते. आजचा अर्थसंकल्प पाहून महायुतीची वर्तणूक जनतेला 'शेंडी' लावण्याची आहे हे सिद्ध झाले.
महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी त्यांच्या लाडक्या भावांकडून महिन्याला मिळणाऱ्या १५०० चे २१०० होणार असा आस लावून बसल्या होत्या. पण लाडक्या बहिणींकडून मतं उकळून झाल्यानंतर त्यांना बदमाश भावांनी साफ फसवले. आज महाराष्ट्राच्या घराघरातील लाडक्या बहिणींच्या पोरांना फडणवीस-शिंदे-पवार हे कसे 'कामापुरता मामा' आहेत याची निश्चित प्रचिती आली. लाडक्या बहिणींच्या या पोरांना 'सरकार तीन मामांचं, पण एकही नाही कामाचं' असं वाटल्यावाचून राहणार नाही.
'खाऊजा' धोरणाच्या बुलडोझरखाली महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकरी चिरडला गेला आहे. कर्जाच्या बोज्याने विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वार्ता दररोज कानावर येत असतात. कर्जमाफीच्या निर्णयाने फासाचे दोर हातात घ्याव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना नुसता दिलासाच मिळणार नव्हता तर कुटुंबंच्या कुटुंबं उध्वस्त होण्यापासून वाचणार होती. हे सरकार सत्तेत येताच कर्जमुक्ती करेल अशा आशेने बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा आजच्या अर्थसंकल्पाने केली.
म्हणे आता महाराष्ट्रात नवे उद्योग धोरण राबवले जाणार आहे आणि त्याद्वारे पाच वर्षांत ५० लाख रोजगार निर्मिती होणार आहे. काही वर्षांपूर्वी देशभरात वर्षाला कोट्यावधींची रोजगारनिर्मिती करण्याचे असेच आश्वासन महामहिम मोदीशेठ यांनी दिले होते. पण तो 'चुनावी जुमला' निघाला आणि निवडणूकीत असे 'जुमले' चालतातच असा निर्वाळाही मोटाभाई अमित शहा यांनी खुलेआम दिला. त्यांचाच 'डि.एन.ए.' असलेले महाराष्ट्र सरकार अर्थसंकल्पातील या तरतुदीवर काय दिवे लावेल तेही कळेलच.
महामानवांचे पानीपत, सुरत, आंबेगाव, वढू बुद्रूक इत्यादी ठिकाणी शिल्प उभारण्याचा संकल्पही आजच्या अर्थसंकल्पाद्वारे मांडण्यात आला आहे. शिवरायांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यास 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देवून गौरवण्यात आले. महाराष्ट्रात महामानवांचा अवमान करणाऱ्या भिडे, कोश्यारी, छिंदम, सोलापूरकर, कोरटकर या सगळ्या संघ-भाजपच्याच पैदाईशी आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रात यांच्याच काळात घडलेली आहे. एकीकडे महामानवांच्या शिल्पासाठी अर्थसंकल्पात अब्जावधींच्या तरतुदी करायच्या आणि दुसरीकडे महामानच्या अवमानास व इतिहासाच्या विकृतीकरणास प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहाय्य करायचे अशा दुतोंडी वृत्तीचे हे सरकार आहे.
शेतीत कृत्रीम बुद्धिमत्ता, सौरऊर्जा, परकीय गुंतवणूक, वीजदरात घट वगैरे घोषणाही या अर्थसंकल्पावेळी झाल्या. लाडक्या बहिणींची, शेतकऱ्यांची आणि बेरोजगार तरुणांची फसवणूक करुन केलेल्या गंभीर जखमेवर केलेल्या या किरकोळ मलमपट्ट्या आहेत. याने महाराष्ट्रात मोठी आर्थिक क्रांती होणार नाही की सर्वसामान्य, श्रमिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार नाही.
महायुतीचा 'डि.एन.ए.' हा निर्लज्जपणाचा, कोडगेपणाचा, खोटारडेपणाचा आणि हुकुमशाही वृत्तीचा असल्याने या 'अनर्थसंकल्पाबाबत' विरोधी बाकावर फार कमी संख्येने शिल्लक उरलेल्या विरोधकांनी केलेल्या आदळ-आपट्याने सरकारवर काही फरक पडेल याची सुतराम शक्यता नाही.
या अनर्थसंकल्पाने धडा घेत पुढील अनर्थ महाराष्ट्रावर ओढवण्याआधी आता महाराष्ट्रातील तमाम रणरागिण्यांनी, कुणब्यांनी, तरुणांनी स्वत:च विरोधकाच्या भूमिकेत कार्यरत राहण्याची नितांत आवश्यकता आहे. लढवय्या महाराष्ट्राकडून एवढी अपेक्षा तर करुच शकतो.
जय भारत, जय महाराष्ट्र!
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा