*अकलूज----प्रतिनिधी*
*शकुरभाई तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयामध्ये राजमाता कै. रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांची २३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मार्गदर्शक, मुख्याध्यापक अमोल फुले, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजीत कांबळे विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. खरेतर अक्कासाहेब म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती शांत, प्रसन्न, निरांजनातील ज्योतीप्रमाणे तेवत राहणारी त्यांची मूर्ती. जीवनात अनेक संघटना तोंड देत त्या उत्तुंग हिमालयाप्रमाणे अचल राहिल्या, परोपकारी वृत्ती मुळे सर्वांच्या राजमाता बनल्या. माळशिरस तालुक्याचे नंदनवन, हिरवा शालु नेसवणारे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रत्येक विचारात, निर्णयात तेवढ्याच तोलामोलाची साथ दिली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी समाधान जाधव, अनुमोदन योगिता वाघमारे यांनी केले तर आक्का साहेब यांच्या विषयी श्रावणी भडकुंभे, फरहान बागवान यांनी मांडले. शिक्षक अस्वरे मॅडम यांनी अक्का साहेब यांचा जीवनपट सांगितला. सुत्रसंचलन तेजश्री चव्हाण तर आभार तेजश्री पवार यांनी मांडले. सदर कार्यक्रमाचे नियोजन मार्डीकर मॅडम यांनी केले.
जाताजाता त्यांची एक आठवण.... १९५० च्या आसपासचा काळ असेल दुपारची वेळ असावी. चुलखंडावर पाण्याचे सपकारे मारून आक्का हात पुसत खोपीबाहेर आल्या. धुराने चुरूचुरून डोळे लाल झाले होते. जरा वेळ बसून दोन घास खाऊन घ्यावे या विचारात होत्या. बाकीची मुलं शाळेत गेली होती. दीड दोन वर्षाचे मदनदादा खोपीत झोपले होते. अचानक खोपीला पाठीमागून आग लागली. रानात काम करणाऱ्या गड्याचं पोरंग आक्का खोप पेटली, खोप पेटली ओरडंत आले. आरडाओरडा सुरू झाला. आक्काच्या काळजात एकदम धस्स झालं धावतच पेटत्या खोपीत शिरल्या आणि झटकन त्यांनी मदनदादाला उचलून छातीशी धरलं आणि बाहेर आल्या. अंग घामाणे वाहत होतं, हातपाय भितीने थरथरत होते. पण मदनदादा आपल्या खुशीत सुरक्षित असल्यांच पाहुन जीव भांड्यात पडला.
एव्हणा खोपीनं धडाडून पेट घेतला होता. वाळलेल्या कुडाने व काडाने पेट घेतला. खोप धडाडून पेटून उठली. चटकन लक्षात आले म्हणून बरं नाहीतर.......? या विचाराने माईमाऊलीच्या डोळ्यात पाणी तरांरलं. पुन्हा संसार उघड्यावर पडला. कुणाला खरेही वाटणार नाही की महाराष्ट्रातला एक आमदार असाही होता याची उजाड माळरानावर झोपडी जळाली होती. उघड्यावर चुल, बोळकी इकडेतिकडे पडलेली. रात्रभर त्यांच्या सोबतीला फक्त वारा होता. ती रात्र तशीच जागून काढली. पुन्हा धैर्याने सकाळी काकासाहेबांच्या व गड्याच्या मदतीने चार भिंती उभ्या करून वरती पत्रा टाकला. पुन्हा सोलापूर जिल्ह्याचा माळशिरस तालुक्याचा संसार तिथंच चालू झाला. आज त्यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटीकोटी अभिवादन......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा