*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
संपदा सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा।।
जावे पंढरीसी आवडे मनाशी।
कई एकादशी आषाढी ये।।
अशा भजनांच्या ओळीगात खांद्यावर भगव्या पताका घेऊन, कपाळी केशरी गंध, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान केलेले आहे. सर्व लहानथोरांपासून आबालवृद्धांपर्यंत मोठ्या भक्तीभावाने वारकरी पंढरपूरला पायी जात असतात. याचेच निमित्त साधून रावबहाद्दूर गट शाळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल -रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ,वासुदेव, वारकरी यांचे पोशाख परिधान केले होते. पालखीचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष दिपाली लोखंडे, अर्चना चव्हाण यांच्या उपस्थितीत केले. बाल वारकऱ्यांची दिंडी विठूरायाचा नाम घोष करत संपूर्ण परिसरातून पुढे जात असताना लोकांनी उत्स्फूर्तपणे विठ्ठल रुक्मिणी यांच पूजन करून ओवाळले. शाळेच्या क्रीडांगणावर रिंगण सोहळा पार पडला आणि मान्यवरांच्या हस्ते पूजा व आरती घेण्यात आली. दरम्यान सर्व महिलांनी फुगडी या पारंपारिक खेळाचा आनंद घेतला.सर्व बाल वारकऱ्यांनी भजन, अभंग, गवळणी म्हणत आणि नाचत खेळत हाती पताकाध्वज, तुळशी वृंदावन घेऊन कपाळाला टिळा लावून मुखात 'ज्ञानोबा- तुकाराम' चा जयघोष करत शाळेचा परिसर दुमदुमून टाकला. विद्यार्थ्यांना फलाहार म्हणून केळी व राजगिरा लाडू यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशा भजनावळे, अर्चना चव्हाण, रतन लोखंडे, मुबारक नदाफ, सुशीला शिंदे, सोनाली कांबळे, विकास लोखंडे, अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण असे सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजमीर फकीर सर यांनी केले तर आभार श्री. श्रीकांत राऊत सर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा