*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आहे. हे लोक खरेच रामाचे भक्त आहेत का? आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर ईडीची कारवाई का झाली नाही? सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत का?, असा परखड सवाल त्यांनी केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, सद्यस्थितीत सरकारमध्ये अत्यंत भावनाशून्य लोक बसलेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाहीत. आज राज्यात दररोज दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. रोजगार हमीच्या मजुरांना वेळेवर पगार मिळत नाही. संसद व विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते. पण याच समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या दोन दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून लाखोंचा खर्च करण्यात आले. एकीकडे पैसे नसल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची. हे पाहून सर्वसामान्य माणसांना किती वेदना होत असतील याची कुणालाही कल्पना नाही.
सत्तेवरचा अंकुश आता सुटलेला आहे. कसायाने एखाद्या वेळी चारा खाऊ घालायचा आणि दररोज गाई-म्हशी कापायच्या याला काय अर्थ आहे? तुम्ही वेगळे काय करता? तुम्ही रामाचे खरे भक्त असाल, तर सांगा भाजपच्या एकाही नेत्याची आजपर्यंत ईडीची चौकशी का झाली नाही? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? तुम्ही आणीबाणीपेक्षाही वाईट वागले हे संपूर्ण देशाला माहिती आहे, असे कडू म्हणाले.
तुरूंगवारी झाली तरी मी थांबणार नाही
बच्चू कडू यांनी आपल्याला कोणत्याही पदाची अभिलाषा नसल्याचेही यावेळी ठणकावून सांगितले. अनेकांना वाटत होते माझ्या मनात पदाची लालसा आहे. पण ते चुकीचे आहे. आमदारकी गेली किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद गेले म्हणजे बच्चू कडू थांबणार, असे नाही. मला तुरूंगात टाकले तरी मी थांबणार नाही. पण हुकूमशाही किती करावी याची काही मर्यादा आहे. बँकेतून अपात्र केले, यांची फाईल एक महिना कुठे दाना टाकत होती? हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
भाजपमधील काही जण आम्हाला बदनाम करत आहेत. बँक तोट्यात असल्याची आवई उठवत आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करेन, तडजोड करेल, असे अनेकांना वाटत होते. पण असे काहीही होणार नाही. कारण माझ्या आडनावातच कडू लागले आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा