उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
हाजी मोहम्मद इसाक फराश फाउंडेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या फैज निकाह डॉट कॉम या मॅरेज ब्युरोचे कार्य अत्यंत परिणामकारकरीत्या सुरू आहे. फैज निकाह मॅरेज ब्युरो पुणे आणि रॉयल रिश्ता अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जुलै २०२५ रोजी पुण्यातील एम. वाय. सी. हॉल, रास्ता पेठ येथे भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात वधू-वरांच्या पालकांनी प्रत्यक्ष सहभागी होत आपल्या पाल्यांच्या विवाहासाठी समोरासमोर संवाद साधण्याची संधी घेतली. फैज निकाह मागील २२ वर्षांपासून विवाह संस्थेच्या माध्यमातून सुलभ, वेळेवर आणि इस्लामच्या सुन्नती पद्धतीने विवाह व्हावा या उद्देशाने कार्यरत आहे.
त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळे, सध्या व्हॉट्सअॅपवर शंभरहून अधिक गट सक्रिय आहेत आणि ऑनलाइन-ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ते विवाह मेळावे आयोजित करून दोन हृदयांना एकत्र आणण्याचे पवित्र कार्य करीत आहेत. आत्तापर्यंत २४६ ठिकाणी ऑफलाइन मेळावे पार पडले असून, आजचा हा २४७ वा मेळावा विशेष ठरला.
या वेळी दौंड येथील कवयित्री, लेखिका आणि समाजसेविका अनिसा सिकंदर शेख यांना एक पालकत्वाची जबाबदारी पार पाडत आपल्या मुलाचे लग्न कोणताही दहेज किंवा आर्थिक अपेक्षा न ठेवता पार पाडल्याबद्दल “जीवन गौरव” सन्मान प्रदान करण्यात आला. समाजात अशा सकारात्मक आणि परिवर्तनशील विचारांची अत्यंत गरज असून, त्यांचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
आज दहेजप्रथा आणि सामाजिक दडपणामुळे अनेक मुली अविवाहित राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत अनिसा शेख यांचे हे कार्य सामाजिक चेतना जागवणारे आणि अनुकरणीय ठरते. त्यांच्या या प्रेरणादायी योगदानाची दखल घेऊन वधू-वर मेळाव्याला उपस्थित सर्व पालकांसमोर सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार, मा. नूरूल अन्सारी, मा. नदीम शेख, मा. डॉ. मुजफ्फर शेख, मा. इब्राहिम शेख,शफक शेख, मोहम्मद पाशा मा. मुस्ताक शेख तसेच मॅरेज ब्युरोचे प्रमुख इंतेखाब फराश, परवीन फराश, यांच्या उपस्थितीत त्यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला.
याच वेळी गझलकार बा. ह. मगदूम आणि इंग्रजी लेखक डॉ. मुजफ्फर शेख यांनाही जीवन गौरव सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी, इंतेखाब फराश यांच्या "निकाह मसाईल और हल" या इंग्रजी अनुवादित पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण देखील संपन्न झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा