Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

*गोरक्षकांना आवर घाला --अजित पवार यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना!.*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मुंबई : गोवंश हत्या बंदीतून बाहेर असलेले आणि कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीवर स्वयंघोषित गोरक्षक आक्षेप घेत असतात. उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेल्या गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आता राज्यातही हा प्रश्न उद्भवला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलिसांना निर्देश देत गोरक्षकांवर आवर घालण्यास सांगितले. जिल्हा पोलीस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यापासून खासगी व्यक्तींना रोखावे, असे निर्देश त्यांनी दिले.

बुधवारी कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी या सूचना दिल्या आहेत. या बैठकीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठीकत उपस्थित असलेल्या सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी रश्मी शुक्ला यांना एक पत्रक काढण्याची सूचना दिली. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही खासगी व्यक्तींना नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश या पत्रकाद्वारे जिल्हा पोलिसांना देण्यात यावे, असे अजित पवार म्हणाले.

गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर कथित गोरक्षक कायद्याच्या आडून म्हैसवर्गीय म्हणजे भाकड म्हैस आणि रेड्यांच्या वाहतुकीचे ट्रक अडवितात आणि जबरदस्तीने पैशांची मागणी करतात, अशी तक्रार कुरेशी समुदायाने अजित पवारांसमोर मांडली. तसेच बेकायदेशीर गोरक्षकांवर बंदी घालावी, कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीला संरक्षण द्यावे, दाखल केलेले खोटे खटले मागे घ्यावेत आणि प्राण्यांच्या वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावेत, अशा मागण्यांचे निवेदन कुरेशी समुदायाकडून करण्यात आले.

“कुरेशी समुदाय पारंपरिकपणे मांस व्यापाराशी संबंधित आहे आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेचा भाग आहे. या समुदायाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही”, असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

बेकायदा गोरक्षकांकडून होत असलेल्या छळाबाबत कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांना निवेदनाद्वारे माहिती दिली. “कुरेशी समुदायातील व्यापारी आणि कायदेशीररित्या परवानगी असलेल्या प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गोरक्षकांनी केलेल्या हिंसक कृत्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे समुदायाला जूनपासून संप पुकारावा लागला आहे. भाकड जनावरांसाठी खरेदीदार नसल्यामुळे शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. २०१५ मध्ये गोवंश हत्याबंदी कायदा झाल्यानंतर कायद्याने परवानगी असलेल्या म्हैसवर्गीय प्राण्यांच्याही वाहतुकीवर परिणाम होत आहे”, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आमदार सना शेखही उपस्थित होत्या. त्यांनी शिष्टमंडळाची मागणी अजित पवारांसमोर मांडली. तसेच असामाजिक घटकांमुळे जनावरांची कायदेशीर वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी दिली. कायद्यानुसार फक्त पोलिसच वाहनांची तपासणी करू शकतात, असे असूनही बेकायदेशीर गोरक्षकांचा धोका वाढत असून त्यावर वेळीच उपाययोजना करण्याचे आवश्यक असल्याचे खोडके म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा