*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मुंबईचा लचका किंवा महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का? याचा प्रयत्न अजूनही केला जातो आहे. हे प्रयत्न जोपर्यंत थांबत नाहीत असे प्रयत्न करणाऱ्यांना आपण संपवत नाही तोपर्यंत मार्मिक आणि शिवसेनेचं काम थांबणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मार्मिकचा वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडला. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत पण लक्ष भरकटवलं जातं आहे
शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत, इतर प्रश्न आहेत. पण आमचं लक्ष भरकटवलं जातं आहे, कुठे तर कबुतरांकडे? भटक्या कुत्र्यांकडे. मी येताना बातमी वाचली भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये डांबून ठेवा. यानंतर देशभरात यावरुन विरोध दर्शवला जातो आहे. भाजपाच्या मनेका गांधी म्हणाल्या की कुत्र्यांना डांबलं तर झाडांवरची माकडं खाली येतील. माकडं खाली आली आहेत. संसदेत बसली आहेत. मी हे उपाहासाने बोलत नाही, जयराम रमेश यांनी खुर्चीवर माकड बसल्याचा फोटो पोस्ट केला होता म्हणून बोलतो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
देशाचे सरन्यायाधीश बी आर गवईंना हात जोडून विनंती आहे की…
देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना धन्यवाद द्यायचे आहेत. देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यांनी जाहीर केलं आहे की मी स्वतः त्यात लक्ष घालेन. याला म्हणतात कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश. त्याच सरन्यायाधीशांना मी विनंती करतो आहे की आपल्या न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडते आहे. तीन ते चार वर्षे झाली ती कधी प्राण सोडेल माहीत नाही. खटला कोर्टात दाखल झाल्यापासून आता आपण चौथे सरन्यायाधीश आहात. लोकशाहीच्या तोंडात न्यायाचं पाणी जर नाही घातलं तर देशाची लोकशाही मरेल. त्यामुळे आपण त्यातही ही लक्ष घाला ही मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचा जो खटला सर्वोच्च न्यायालयात आहे त्याबाबत उद्धव ठाकरेंनी हे विधान केलं.
विंचू चावला हे तोतया एकनाथांचं नाही संत एकनाथांचं भारुड-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, नोकऱ्या नाहीत, तरीही सगळं चांगलं चाललं आहे. ट्रम्प दम देतात, मतांची चोरी समोर आली तरीही सगळं छान चाललं आहे. या सगळ्यात आपल्या राज्याची जी काही संस्कृती आहे त्याचा आपला विसर पडत चालला आहे. मार्मिकमध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृतीचं काम केलं, अनिष्ट प्रथा-परंपरांवर बोट ठेवण्याचं काम केलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. विंचू चावला हे एकनाथ महाराजांचं भारुड आहे. तोतया एकनाथांचं नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. साधू संतांची जी काही शिकवण आहे ती आपल्याला कायमच मार्ग दाखवत आली आहे. पूर्वी एका चित्रपटात गाणं होतं जगात नाही राम रे, दाम करी काम. ते आत्ता असतं तर भाजपावल्यांनी बंदी घातली असती. म्हणाले असते की हा जगात नाही राम म्हणतो. पण त्याच्या पुढची ओळ महत्त्वाची आहे, दाम करी काम. आत्ताही तशीच स्थिती आहे. एकीकडे जय श्रीराम म्हणायचं आणि पैसे देऊन धुमाकूळ घालायचा हे या नासलेल्या लोकांच्या सरकारमध्ये चाललं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा