आम्ही जन्माने शेतकरी
अनिसा सिकंदर शेख
आम्ही जन्माने शेतकरी, शेतकरी,
करतो काळ्या मायेची चाकरी ॥ ॥
काळ्या मायेवर आमचं पोट,
मनात नाही आमच्या खोट.
दुनिया जगते आमच्या धान्यावरी!॥१॥
पावसाविना पडीक वावर,
सतत असतो जीवाला घोर;
नशिब आमचं निसर्गावरी.॥२॥
शेतकऱ्याचं जीवन लई वंगाळ,
चांगला-चांगला होतोय घायाळ;
कष्ट करूनही पदरी लाचारी.॥३॥
बाप आमचा फाटक्या कपड्यात,
मायच्या पायात काटा रुततात,
बसल्या-बसल्या व्यापारी मजा करी.॥४॥
हुंड्यापायी बहीण बिनलग्नाची,
सोयरीकही जमाना भावाची;
सगळीकडेच आमची लाचारी.॥५॥
येत नाही आम्हाला राजकारण,
कर्जापायी शेत आमचं तारण;
व्याज घ्यायला सावकार दारी.॥६॥
कसं जगावं, काही कळत नाही,
शाळा शिकायला पैसाही नाही;
आमच्या मालाची मोल भाव करी?॥७॥
कशी भागवावी पोटाची भूकं?
संगतीला दावणील बांधलेली मूकं;
वेळेवर मिळत नाही कधी भाकरी.॥८॥
घरात बनत नाही कधी गोडधोड,
सखीच्या पदराला सतत असतो जोड;
सारं घरदार आमचं कष्ट करी.॥९॥
सण करतोय सदा उसणवार,
मानत नाही मी कधीही हार;
पूर्ण करतोय जबाबदारी!॥१०॥
(समाज प्रबोधन पर गीत)
अनिसा सिकंदर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा