उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्युज मराठी
मुस्लिम समाजासाठी मोरे बंधूंनी केले मोफत दुध वाटप.
गणेशगांव (ता.माळशिरस) येथील ज्ञानेश्वर सोपान मोरे,सोमनाथ चांगदेव मोरे, दतात्रय रामचन्द्र मोरे, बापू सोपान मोरे हे चार बंधू गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसाया बरोबर दुग्ध व्यवसाय करीत आहेत. प्रत्येक वर्षी मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान ईद ला शीरखुर्मा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी मुस्लिम बांधवांची असते.त्यादिवशी एक रूपया हि न घेता मुस्लिम बांधवांना मोफत दूध वाटप करून हे कुटुंब पुण्याचे कार्य करीत आहे. गावातील सर्व समाजाच्या धार्मिक कार्यात हे मोरे परिवार सहभागी होतात
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागात हे गणेशगांव असून या गावाची लोकसंख्या दिड हजार आहे या गावातील सर्व लोक प्रत्येक समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात तन,मन आणि धन यांनी सहभागी होत असतात.या गावातील मोरे परिवार यांनी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांसाठी पाचशे लिटरचे दुधाचे मोफत वाटप करून सर्वधर्म समभाव जागृत ठेवला आहे.मोरे यांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्याला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात . त्यापासून त्यांना दररोज चारशे ते पाचशे लिटर दुधाचे उत्पादन मिळते .पैसे देऊन कोणी मुस्लिम बांधव दूध विकत घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर मोरे बंधू हातात पैसे घेत नाहीत .ईद च्या दिवशी दुधाचे पैसे देणार असाल तर आमच्याकडे दूध नाही असे सांगून भक्ती भावाने दूध वाटप करतात . मुस्लिम बांधव महिनाभर रोजे ( उपवास ) , दान धर्म करून पुण्य कमवितात, म्हणून एका दिवसाचे दुध रमजान ईद या सणासाठी मुस्लिम बांधवांसाठी मोफत वाटप करून पुण्य कर्म करून सर्व धर्म समभावाची विचारधारा आपल्या कृतीतून दर्शवितात .
त्याच बरोबर तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पाचशे लोकांच्या दिंडीतील वारक-यांना भोजनाची दरवर्षी सोय करतात.गावात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमास सतत मदत करीत असतात.त्यामुळे गणेशगांवातील नागरिक धार्मिक सण समारंभाच्या
माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम करीत आहेत.
माणूस म्हणून जगताना एकमेकांच्या धार्मिक भावना जपणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आणि हिच खरी राष्ट्रभक्ती आहे. प्रत्येक भारतीयाने जर अशी धार्मिक भावना जपली तर विविधतेने नटलेला भारत देश सदैव सुजलाम सुफलाम राहील .देशात सुख शांती राहील.
*चौकट*
*रमजान ईद सणाला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी मुस्लिम बांधवांची असते. कोणी पैसे घ्या आणि दूध द्या असे म्हणाले तर मोरे कुटुंबीय म्हणतात की,महिनाभर तुम्ही उपवास करता दानधर्म करत असता आणि पुण्य मिळवता मग सणाच्या दिवशी आम्हला ही थोडेसे पुण्य कमवू द्या.शेवटी आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा