Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

*"ईडीची गती वाढवा"-- सदाभाऊ खोत ,यांचे फडणवीस यांचे कौतुक करताना वादग्रस्त विधान*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

सोलापूरमधील माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचा ‘म्हातारा’ असा उल्लेख करत त्यांच्यावर तोंडसूख घेतले होते. तर याच भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असताना त्यांनी ईडीवर वादग्रस्त विधान केले आहे. या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी यावर टीका केली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

सदाभाऊ खोत म्हणाले, “कुणी काहीही म्हणू द्या, पण देवेंद्र फडणवीस यांना मानतो. लोक म्हणतात काही झालं तरी ईडी मागे लावतात. पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे.” सदाभाऊ खोत यांच्या विधानामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानावर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली. ते म्हणाले, सदाभाऊ खोत म्हणतात, ईडीची अशी भीती दाखवा की, गडी एकतर घाबरून महायुतीत आला पाहीजे नाहीतर कोलमडून पडला पाहीजे. माननीय सदाभाऊ खोत यांना मी विनम्रपूर्वक सांगू इच्छितो. या महाराष्ट्राने आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही पाहिली. पण या शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा असा अंगार निर्माण केला की, जेवढी दडपशाही कराल, तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. तुम्ही अशी अरेरावी करणार असाल तर मराठी माणूस उसळल्याशिवाय राहणार नाही.

शरद पवारांबद्दल काय म्हणाले होते खोत?

माढातील सभेत शरद पवार यांच्याबद्दल बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, "लोकसभेची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा म्हणजेच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. मतदारसंघात शरद पवारांबाबत अनेक गोष्टी ऐकू येतील. शरद पवारांचं वय ८४ आहे म्हणून ते ८४ सभा घेणार अशाही चर्चा सुरु आहे. पण मला सांगा शरद पवारांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत की जनावरांना पाणी पाजायचं आहे. या वयातही आमच्यासारख्यांना ते संधी देत नाहीत" असं सदाभाऊ खोत म्हणाले.

"मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवारांच्या लक्षात आलं की म्हातारं काही कंबरेची किल्ली काढत नाही, म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करु द्या, आम्ही प्रपंच म्हातारं झाल्यावर करायचा का?" हे म्हणत विकासासाठी अजित पवार महायुतीत आले असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा